कापूरहोळ – मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही. भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावरील निगडे गावात सर्व गावकऱ्यांनी तालुक्यातील सर्व पक्षीय पुढारी आणि येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार करत मतदान करणार नसून, लवकरच तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हा निर्णय सकल मराठा समाज भोर तर्फे झालेल्या बैठकीत झाला आहे. निगडेतील तरुण ग्रामस्थांनी हा निर्णय स्वीकारत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या निर्णयाचे पंचक्रोशीत आणि भोर तालुक्यात समर्थत होत असून, यापुढे निगडे गावात राजकीय पक्ष पुढाऱ्यांनी प्रवेश करू नये, असे जाहीर आव्हान येथील ग्रामस्थांनी केले आहे.
“मराठा समाजाचे राज्यात जवळ जवळ 147 आमदार आहेत. मात्र, मराठा समाज मागास राहिला. आकरा वेळा मराठी समाजाचा मुख्यमंत्री झाला, तरी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही याची खदखद समाजमनात आहे. यावर सरकारने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. सकल मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे उभा आहे.” – नाजूकाताई बारणे, सरपंच, निगडे