स्टॉकहोम (स्वीडन) – जागतिक किर्तीची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग या युवतीने ब्राझीलच्या ऍमेझॉनमधील आदिवासींसाठी करोनाविरोधी उपाययोजना आणि वैद्यकीय सुविधांसाठी आपल्याला मिळालेल्या 1.14 दशलक्ष डॉलरमधील 14 हजार डॉलरची देणगी देऊ केली आहे.
पोर्तुगालच्या कालोस्ते गुल्बेन्कियान फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा पहिला पुरस्कार याच आठवड्यात ग्रेटा थनबर्गला देण्यात आला. या पुरस्कारांतर्गत तिला 1.14 दशलक्ष डॉलरचा निधी देण्यात आला आहे.
आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक रक्कम आपल्याला या पुरस्कारातून मिळते आहे. त्यामुळे ही रक्कम पूर्णपणे न स्वीकारता त्यातील काही भाग आदिवासींवरील उपचारांसाठी देण्याचा आपला विचार आहे. या निधीतील काही भाग आपण आदिवासींसाठी करोना उपचार सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि विविध उपाय योजनांसाठी देणार असल्याचे ग्रेटा थनबर्गने ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
“एसओएस ऍमेझोनिया’ या संस्थेच्या माध्यमातून ही देणगी ऍमेझॉनमधील आदिवासींसाठीच्या उपचारांसाठी दिली जाणार आहे, असेही तिने म्हटले आहे. ही संस्था ऍमेझॉनमधील वनजीवनाच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. ऍमेझॉनमधील आदिवासींमध्ये आरोग्य, अन्न, आरोग्य सुविधांबाबत किमान जागरुकता निर्माण करण्याचे कामही ही संस्था करते.
थनबर्ग “स्टॉप इकोसाईड फाउंडेशन’ या संस्थेलाही 1,14,000 डॉलरची देणगी देणार आहे. वनसंपदेचा नाश करणे हा आंतरराष्ट्रीय गुन्हा केला जावा, यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.
याशिवाय उर्वरित रक्कम ती तिच्या स्वतःच्या संस्थेला देणगी देणार आहे. नैसर्गिक आणि पर्यावरणाच्या आपत्तीमधील पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांसाठी तिची संस्था कार्यरत असते.