बारामती/ जळोची – म्युकरमायकोसिसचे लोण आता बारामतीतही पसरु लागले आहे. बारामतीत नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन फलटण बारामती शाखेच्या वतीने आयोजित शिबिरात 14 रुग्ण आढळले आहेत.
नटराजचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, नवीन आजारासाठी बारामतीत स्वतंत्र कक्ष स्थापन करून मोफत उपचार
करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिबिरामध्ये 650 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली. बुरशीजन्य आजाराचे निदान झाल्यानंतर काही जणांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासणार असून इतर चाचण्याही कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, रुग्णांना गरजेच्या औषधांचा पुरवठा जिल्हाधिकारी स्तरावर केला जाणार असल्याचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी नमूद केले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयातून रुग्णांवर उपचाराची सुविधा दिली जाईल. बारामतीत आता रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे,
तिसरी लाट व म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढू नये या उद्देशाने प्रशासनाने प्रयत्न सुरु केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.