नवी दिल्ली – आंध्र प्रदेशात लोकसभेसोबतच राज्याच्या विधानसभेचीही निवडणूक होत असून राज्याच्या सहा माजी मुख्यमंत्र्यांची मुलेही यासाठी रिंगणात उतरली आहेत. या यादीत विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यापासून सूर्यप्रकाश रेड्डी यांची नावे समाविष्ट आहेत.
जगनमोहन रेड्डी हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय एस राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आहेत. ते पुलिवेंदुला मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. राजशेखर रेड्डी यांचाच हा मतदार संघ आहे. १९७८ ते २००९ या काळात या मतदारसंघातून ते सहा वेळा आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आहेत. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर सप्टेंबर २००९ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
तेलगु देसम पार्टीने मंगलागिरी येथून नारा लोकेश यांना तिकीट दिले आहे. ते माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आहेत २०१९ ची निवडणूक नारा लोकेश यांनी येथूनच लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी वाएसआर कॉंग्रेसच्या एम लावण्या यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. नारा लोकेश यांचे पिता तीन वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहीले आहेत तर त्यांचे आजोबा एन टी रामा रावही मुख्यमंत्री होते. एनटीआर तेलगु चित्रपटसृष्टीतील महान कलाकार होते. १९८२ मध्ये त्यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना केली होती.
अभिनेते आणि हिंदुपुर येथील आमदार एन. बालकृष्णा हे एनटीआर यांचे पुत्र पुन्हा हिंदुपुरा येथून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरून पूर्वी रामा राव आणि त्यांचे पुत्र एन. हरिकृष्ण यांनीही निवडणूक लढवली आहे. प्रदीर्घ काळापासून ही जागा एनटीआर यांच्या कुटुंबाकडेच असून ती त्यांचा बालेकिल्ला मानली जाते.
आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन. जनार्दन रेड्डी यांचे पुत्र एन रामकुमार रेड्डी वायएसआर कॉंग्रेसकडून वेंकटगिरी येथून निवडणूक लढवत आहेत. तर माजी मुख्यमंत्री विजय भास्कर रेड्डी यांचे पुत्र सूर्य प्रकाश रेड्डी यांना तेलगु देसम पार्टीने धोन येथून रिंगणात उतरवले आहे.