शशिकला यांना निष्प्रभ करण्यासाठी अण्णाद्रमुक ऍक्‍शनमध्ये

चेन्नई – तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मैत्रीण व्ही.के.शशिकला पुन्हा अण्णाद्रमुकवर ताबा मिळवण्यासाठी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. त्यातून शशिकला यांना निष्प्रभ करण्यासाठी अण्णाद्रमुक सरसावला आहे. शशिकला यांच्याशी संपर्क ठेवल्याबद्दल पक्षाने 17 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकवर ताबा मिळवण्यासाठी त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष झाला. माजी मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आणि माजी उपमुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांनी एकत्र येत शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे अण्णाद्रमुकला तामीळनाडूची सत्ता गमवावी लागली. त्यामुळे त्या पक्षात अस्वस्थता पसरली आहे. त्याचा लाभ उठवून शशिकला पुन्हा अण्णाद्रमुकमध्ये शिरकाव करण्याच्या हालचाली करत असल्याचे वृत्त आहे.

सोशल मीडियातून अलिकडेच दूरध्वनीवरील काही संभाषणे लिक झाली. त्यातून शशिकला अण्णाद्रमुकच्या काही नेत्यांशी संपर्क साधून असल्याचे उघड झाले. त्यामुळे सतर्क झालेल्या अण्णाद्रमुकने कारवाईचा बडगा उगारला आहे.

शशिकलांच्या संपर्कात असणाऱ्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे धोरण त्या पक्षाने अवलंबले आहे. शशिकला यांना पक्षापासून दूरच ठेवण्याचा निर्धार पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.