…तर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारेन; नाना पटोलेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

मुंबई – राज्य सध्या करोनाची लढाई लढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत खलबत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कॉंग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असेही सूतोवाच केले. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहे.

नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पण शरद पवार यांनी आपल्या पक्षाबाबत भूमिका मांडली, मी माझ्या पक्षबाबत भूमिका मांडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच जनभावना कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आहे आणि कॉंग्रेस 2024मध्ये राज्यात एक क्रमांकाचा पक्ष असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच वर्षे मुख्यमंत्री असतील. कॉंग्रेसमुळे सरकार अडचणीत येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक म्हणाले, नाना पटोले यांनी त्यांचा पक्ष पुढील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. कोणालाही एखाद्या पदाची अपेक्षा करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच किमान-समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या वक्‍तव्याला महत्त्व नाही – अजित पवार
राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व देण्याचे कारण नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचे विधान करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मताला त्यांनी महत्त्व नसल्याचे त्यांना यावेळी अधोरेखित केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.