इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे आगामी निवडणुकीत किमान तीन ठिकाणी उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. पीटीआय पक्षाच्यावतीने आज ही माहिती देण्यात आली.
इम्रान खान यांना तोशखाना गैरव्यवहार प्रकरणी सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले असून त्यामुळे त्यांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवायला अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांची ३ वर्षांची शिक्षा स्थगित केली आहे. मात्र अन्य प्रकरणी ते सध्या अदियाला तुरुंगातच आहेत. ते किमान तीन ठिकाणांवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांच्या वकिलांनी अदियाला तुरुंगाबाहेर माध्यमांना सांगितले.
पक्षाचे प्रमुख नेते जरी तुरुंगात असले तरी पीटीआयच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रमुख मेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.