इम्रानखान यांनी केली भाजपची पंचाईत !

नवी दिल्ली – मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर आले तर काश्‍मीर प्रश्‍नावर त्यांच्या सहयोगाने तोडगा काढणे सोपे जाईल असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्यानंतर भाजपला त्याचा आनंद व्हायच्या ऐवजी त्यांची अधिकच पंचाईत झालेली आज बघायला मिळाली. कॉंग्रेसनेही ही संधी साधून मोदींना पेचात पकडले आहे. पाकिस्तान आज अधिकृतपणे भाजपला जॉईन झाला आहे, आता मोदींना मते म्हणजेच पाकिस्तानला मत असे चित्र निर्माण झाले आहे. मोदींनी पहिल्यांदा नवाज शरीफ यांच्यावर प्रेम केले आता त्यांची इम्रानखान यांच्याशी यारी झाली आहे त्यामुळे पाकिस्तान या विषयावरून त्यांनी वाजलेल्या ढोलाचा खोटेपणा उघडा पडला आहे अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोदींनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदीच पुन्हा सत्तेवर येण्याविषयी इम्रानखान यांनी अनुकुल मत व्यक्त केल्याने मोदींची भलतीच पंचाईत झाली आहे. या वक्तव्याबद्दल इम्रान खान यांचे आभार मानायचे की त्यांनी व्यक्त केलेल्या भावना धुडकाऊन लावायचा हा पेच आता भाजपपुढे निर्माण झाला आहे. या प्रकरणी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की इम्रान खान यांनी दिलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रीया द्यायची यावर भक्तांचा आता गोंधळ निर्माण झाला असेल. मोदींना समर्थन दिल्याबद्दल इम्रान खान यांचे समर्थन करायचे की नाहीं याचा पेच आता त्यांच्यापुढे निर्माण झाल असावा.

इम्रानखान यांनी म्हटले आहे की कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतात सरकार सत्तेवर आले तर ते काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करण्यास घाबरेल कारण त्याचा भारतातील राजकारणावर विपरीत परिणाम होईल अशी धास्ती त्यांच्या मनात निर्माण झालेली असेल. पण मोदींच्या नेतृत्वाखाली उजव्या विचारसरणीचे सरकार सत्तेवर आले तर काश्‍मीर प्रश्‍नावर त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणे सोपे जाणार आहे. रॉयटर या संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.