लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गुरुवारी अमेरिकेच्या दौऱ्यावरुन मायदेशी परतले. यावेळी पहिल्यांदाच अमेरिका दौरा करुन परतले असल्याने समर्थकांनी इम्रान खान यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मला एखाद्या राजकीय दौऱ्यावरुन परतल्याचे वाटत नसून मी क्रिकेटचा विश्वचषक जिंकूण मायदेशात परतलो आहे, असे मला या स्वागतावरुन वाटत आहे.
सोमवारी इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये सविस्तर चर्चा केली. यासोबतच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांचीही भेट घेतली होती. इम्रान खान कतार एअरलाईन्सच्या विमानाने गुरुवारी सकाळी नवीन आंतरराष्ट्रीय इस्लामाबाद विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांचे समर्थक आधीच विमानतळावर उपस्थित होते. इम्रान खान येताच त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले.