लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा नव्या वादात अडकल्याचे समोर आले आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे इम्रान खान यांचा पाय खोलात गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये इम्रान खान एका महिलेबरोबर अश्लील संभाषण करत असल्याचा आरोप केला जात आहे.
पाकिस्तानमधील पत्रकार सय्यद अली हैदर यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन दोन तुकड्यांमध्ये ही संपूर्ण ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक पुरुष महिलेशी अगदी अश्लील भाषेमध्ये गप्पा मारत असल्याचे ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमधील पुरुषाचा आवाज हा इम्रान खान यांचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप ही काही पहिलीच क्लिप नसून इम्रान खान सत्तेमधून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या अशा अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.
सध्याचे सरकार आणि लष्कर इम्रान खान यांच्याविरोधात कट करत असल्याचा आरोप त्यांनी स्वत: अनेकदा केला आहे. इम्रान यांच्या पीटीआय या पक्षानेही अनेकदा त्यांच्यावर होणारे आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तानमधील बातम्यांच्या काही वेबसाईट्सने दिलेल्या वृत्तानुसार सध्या व्हायरल झालेला फोनचा ऑडिओ पंतप्रधान कार्यालयामधील आहे.
Khan sb can do whatever he wants in his personal life but I hope he will stop presenting himself as some kind of role model Muslim leader for the entire Ummah.
— Hamza Azhar Salam (@HamzaAzhrSalam) December 20, 2022
हा वादग्रस्त ऑडिओ किती खरा आहे याबद्दल साशंकता व्यक्त केली जात असली तरी पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी या ऑडिओमधील आवाज हा इम्रान खान यांचाच असल्याचा दावा केला आहे. “खान साहेबांना त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही करायचं आहे ते करु शकतात. मात्र मला अपेक्षा आहे की त्यांनी मुस्लीम नेतृत्व म्हणून सर्वांसमोर जाणं थांबवावं,” असे पत्रकार हमाज अझर सलाम यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. .
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआय या पक्षाने ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे. पीटीआय़चे नेते डॉ. अर्सलान खलिद यांनी, “पीटीआयच्या अध्यक्षांचे राजकीय वैरी असणारे खोटे ऑडिओ आणि व्हिडीओ बनवण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करु शकत नाही,” असा टोला लगावला आहे.