students news – परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या ओबीसी समाजाच्या 50 विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत, अशी माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. याबाबत इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.
शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी 2023-24 मध्ये 50 ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली असून या वर्षातील बॅचमधील 32 तर, मागील बॅचमधील 2 विद्यार्थांना 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांवर उपासमारीचे संकट आले होते. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्यामुळे जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही, यासारखे दुर्दैव नाही, असा संताप व्यक्त करत सरकारने या विद्यार्थ्यांना तातडीने पैसे पाठवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.