मुंबई – देशभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचे चित्र आहे. रुग्णवाढीमुळं सहाजिक अनेक प्रकारच्या औषधांचा आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रेमडेसिव्हीरचा देखील तुटवडा आहे. त्याचाही काळाबाजार सुरू झाला आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकराने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोना लस, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मात्र रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारकडून आता जिल्हा स्तरावर कंट्रोल रुमची उभारणी केली जाणार आहे.
जिल्हा स्तरावर एक तांत्रिक समिती गठीत करुन त्यामार्फत विशिष्ट पद्धतीनं खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा उपयोग व्यवस्थित होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिव्हीरची गरज भासल्यास राज्य स्तरावरील FDAच्या कंट्रोल रुमशी संपर्क करुन कारवाई केली जाणार आहे. जिल्हा स्तरावर यासाठी कंट्रोल रुम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हे रोखण्यासाठी आता ऑक्सिजन कंट्रोल रुममध्येच रेमडेसिव्हीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारीचं निवारण स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत केलं जाईल.