औरंगाबाद : गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी मद्याच्या दुकाणावरच चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्या काळात लॉकडाऊनमुळं कुठंही मद्य मिळत नव्हतं. त्यामुळं प्रशासन देखील गोंधळलं होतं. औरंगाबादमध्ये चोरट्यांना टक्क उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचं कुलूप तोडून दारूचे बॉक्स लंपास केले आहे.
उत्पादन शुक्ल विभागानं जप्त केलेल्या दारुवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याठिकाणाहून जवळपास अडीच लाख रुपयांची दारू चोरून नेली असल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबादेत शासकीय दूध डेअरी परीसराच्या मागच्या बाजुला असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली दारु ठेवलेली असते. यात अनेक वर्षांपासूनच्या जप्त देशी-विदेशी दारुचा समावेश असतो. याठिकाणी सुरक्षारक्षकांचा कडक पाहाराही असतो. मात्र तरीही चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करत दारुचे बॉक्स पळवले. पत्रे उचकटून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. हा चोरीचा प्रकार समोर आल्यानं पोलिसांत तक्रार देऊन याचा तपास सुरू करण्यात आला.