नांदेड – विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी दंड ठोठावला. यावर चिडलेल्या या व्यक्तीने पोलिसावरच हल्ला चढवला. यात पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर कच्छवे गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारच्या सुमारास घडला.
राज्यात दोन दिवसांचा “वीकेंड लॉकडाऊन’ लागू आहे. यादरम्यान पोलीस ठिकठिकाणी गस्तीवर आहेत. नागरिकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. पण, काही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. असाच प्रकार नांदेडमध्ये समोर आला.
नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला मास्क न वापरल्याबद्दल अडवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यावर चिडलेल्या या व्यक्तीने थेट पोलिसावर हल्ला चढवला. यात कच्छवे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, संबंधित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.