पुणे – पुणे शहरासह जिल्ह्यात करोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात “मुंबई पॅटर्न’ राबवा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्यात ऍण्टीजेन चाचणी पाठोपाठ ऍण्टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळेल, असे ते म्हणाले.
खासदार वंदना चव्हाण, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.