पिंपरी, दि. 28 – शहराच्या विविध भागांमध्ये गुरुवारी (दि. 28) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनंत चतुदर्शीला होणारे गणरायाचे विसर्जन काही मंदावले होते. मात्र, पावसाच्या विश्रांतीनंतर शहराच्या विविध भागांत घरगुती गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
दुपारी सुमारे तासभर पावसाने पिंपरी-चिंचवड शहराला झोडपून काढले. त्यामुळे घरगुती गणेश विसर्जनाला काहीसा ब्रेक लागला. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दुचाकी, तीन चाकी व चारचाकीमधून विसर्जन हौदाकडे येणारी गणेशभक्तांची गर्दी वाढू लागली. यामध्ये बालचमूंची संख्या अधिक होती. “गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’,” एक,दोन, तीन, चार – गणपतीचा जयजयकार’ या घोषणांनी परिसर दुमदूमून गेला होता.
महापालिकेच्या वतीने विसर्जन हौदाजवळ गणेश पूजेकरिता विशेष टेबलांची व्यवस्था केली होती. तर निर्माल्य संकलनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.