मुंबई – अभिनेत्री सुष्मिता सेनला मार्च महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. या वृत्तानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. तिच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून स्टेंट टाकण्यात आल्याचे तिने सांगितले होते. आपल्या चांगल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या 47 सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र सुष्मिताने या काळातील तिचा अनुभव सांगितला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता म्हणाली की, “आयुष्यातील तो एक टप्पा मी पार केला आहे. मी खूप नशिबवान आहे की त्या टप्प्याला पार करून मी पुढे येऊ शकले. पण आता मला आजारपणाची भिती वाटत नाही. उलट आता मी आयुष्याकडे आणखी सकारात्मकतेने पाहते. जेव्हा तुम्हाला नव्यानं आयुष्य मिळतं, तेव्हा तुम्ही त्याचा आणखी आदर आणि काळजी करता.” सुष्मिताच्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेजेस होते. यातून बरं होताच तिने पुन्हा एकदा वर्कआऊट सुरू केले होते. यावेळी तिने जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे बरे होण्यास मदत झाल्याचेही सांगितले होते.
यापूर्वी सुष्मिताने एक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमचे हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. स्टेंट टाकण्यात आले आहे. आता माझे हृदय सुरक्षित आहे,’ असे तिने म्हटले होते.
मार्च महिन्यात सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘आर्या 3’ची शूटिंग थांबवली होती. मात्र उपचारानंतर तिने लगेचच कामाला सुरुवात केली आणि वेब शोचं शूटिंग पूर्ण केले.