नारायणगाव -अवैध गुटखा, पान मसाला साठा करणाऱ्या धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील दोन जणांवर अन्न व औषध प्रशासनाने नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करून 7 लाख 24 हजार रुपयांचा अवैध गुटखा, पान मसाला जप्त केला आहे.
गणेश मारुती शेळके (वय 35) आणि बलराव सर्वेश्वर बेहरा (वय 22, दोघे रा. धनगरवाडी ता. जुन्नर) यांच्यावर कारवाई केली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी बुधवार (दि. 15) फिर्याद दिली.
धनगरवाडी येथे गुटख्याचा मोठा साठा असल्याच्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या पथकाने छापा टाकून राजविलास पान मसाला – हिरवा, जांभळा, ब्राऊन, पिंक, आरएमडी पान मसाला – निळा – लाल, एक सुगंधित तंबाखू, गोवा 1000, सागर पान मसाला, एसआर तंबाखू, व्ही 1 तंबाखू – ब्राऊन, पर्पल, पिंक, रजनीगंधा पान मसाला, हिरा पान मसाला, रंग बाझ पान मसाला, आंटी नंबर 1, राजू विलायची सुपारी, सावरया गोल्ड, आरबी झेड च्युविंग टोबॅको, रॉयल टॉबको, प्रिमियम एमपी हे सर्व प्रकारचे 494 किलो पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील तपास करीत आहेत.