नगर – अकोले तालुक्यातील चौकशीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांना ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल सादर केलेला आहे.
जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करीत या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केली होती. ही चौकशी एकूण तीन पथकांमार्फत करण्यात आलेली आहे. या तीनही समित्यांचा एकत्र अहवाल तयार करण्यात आलेला असून तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आलेला आहे.
अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील गैरव्यवहार व गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य सुषमा दराडे यांनी उपोषण केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी येत्या दहा दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. या पथकांनी अकोल्यातील तक्रार झालेल्या ग्रामपंचायतीसह पंचायत समितीत जाऊन कागदपत्रांची तपासणी करून चौकशी केलेली आहे. या चौकशीचा अहवाल तयार करून तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आलेला आहे. ते काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे.