– मत्स्य व्यवसाय मंत्र्यांचे निर्देश
मुंबई : अवैधपणे मासेमारी करणाऱ्या मच्छीमार नौकांचे परवाने रद्द करण्यात यावेत, असे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी दिले. याशिवाय परराज्यातील मच्छीमार नौका राज्याच्या सागरी हद्दीत विनापरवाना मासेमारी करीत असतील तर अशा नौकांना बंदी घालण्याची आणि अवैध मासेमारी रोखण्याची सूचनाही त्यांनी केली.
कोकणातील विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलईडी दिव्यांच्या मदतीने होणाऱ्या अवैध मासेमारीच्या संदर्भात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. एकाच परवान्यावर दहा-दहा ट्रॉर्लस एलईडीद्वारे मासेमारी करत असल्याच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे असे ट्रॉलर्स आढळल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा शेख यांनी दिला. सागरी मासेमारीच्या संदर्भातील सर्वच सूचनांची अंमलबजावणी करण्यास सरकार कटीबध्द आहे. परराज्यातील एकही मासेमारी नौका राज्याच्या हद्दीत येऊन यापुढे मासेमारी करणार नाही.
अथवा राज्यातील एकही अनधिकृत पर्ससीन तसेच एलईडी पर्ससीन नौका मासेमारी करण्याची हिंमत दाखवणार नाही अशा पध्दतीने विभागाने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्राच्या सागरी मत्स्योत्पादनाचे संरक्षण करून त्या मत्स्योपादनाचा लाभ महाराष्ट्रातील स्थानिक मच्छीमारांनाच मिळावा ही सरकारची भूमिका आहे.
त्यासाठी महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981, पर्ससीन नेट मासेमारीवर निर्बंध घालणारी अधिसूचना या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश अस्लम शेख यांनी अधिकाऱ्यांना दिले.