चेन्नई – पोलीस दलात ऑर्डरली संस्कृती जोपासणे दलाचे मनोधैर्य खच्ची करणारे असून पोलीस कर्मचाऱ्यांचा घरगुती कामासाठी वापर करून घेणे बेकायदेशीर असल्याचे खडे बोल मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांसाठी रेसीडेन्शीयल असिस्टंटस्ची नियुक्ती केली जाऊ शकते. मात्र प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची घरगुती कामांसाठी ऑर्डरली म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. या कामासाठी गणवेशधारी कर्मचाऱ्यांचा उपयोग करून घेणे बेकायदा आहे, असे न्यायाधीश एस. एम. सुब्रमणियम यांनी स्पष्ट केले.
ज्या अधिकाऱ्यांकडे पोलीस कॉन्स्टेबल ऑर्डरली म्हणून काम करत असतील त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत. गरज पडली तर फौजदारी गुन्हे दाखल केले जावेत असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायाधीश पुढे म्हणाले प्रशिक्षित कॉन्स्टोबल्सना जवळपास 45 हजोर रूपये पगार दिला जातो. त्यामुळे घरकामांसाठी त्यांचा वापर करून घेणे आता पूर्णपणे थांबले पाहिजे. असे जे कोणी ऑर्डरली म्हणून काम करत असतील त्यांना तात्काळ परत बोलावले जावे असे निर्देशही न्यायालयाने दिले.
दरम्यान, आपण चार आठवड्यात याबाबतची माहिती देण्याची सूचना राज्याचे पोलीस महासंचालकांना दिले असल्याची माहिती तामिळनाडूचे गृहसचिव के. फणिंद्र रेड्डी यांनी कोर्टात दिली.