हॉटेल्स, ढाब्यावर अवैध दारूची “झिंग’

निवडणुकीची पार्श्‍वभूमी : मावळातील हॉटेल, ढाब्यांवर खुलेआम विक्री

कामशेत – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये इच्छुकांना उमेदवारीचे वेध लागले असले तरी प्रत्यक्षात उमेदवारीच्या आशेवर असलेल्या अनेकांनी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी “जेवणावळी’ सुरू केलेल्या दिसतात. ठिकठिकाणी “ओल्या पार्ट्यां’ची पद्धतीशीरपणे व्यवस्था केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, ग्रामीण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यांनी संयुक्‍तपणे “वॉच’ ठेऊन असले तरी मावळात सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीकडे “अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याची दिसून येत आहे.

सध्या विधानसभेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने व स्थानिक पोलिसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे मावळातील शहरी तसेच ग्रामीण भागातील हॉटेल, ढाबे व चायनीजच्या टपऱ्यांवर बेकायदेशीरपणे देशी व विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहेत.

मावळ तालुक्‍यातून पुणे-मुंबई महामार्गालगत व ग्रामीण भागात अलीकडच्या काळात छोट्या व मोठ्या हॉटेल आणि ढाब्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, फक्‍त जेवणाची विक्री करून फारसा नफा मिळत नसल्याने या छोट्या-मोठ्या हॉटेलवर सर्रासपणे बेकायदेशीररीत्या दारूची विक्री केली जाते आहे. हॉटेल चालकांनी बार व परमिट रूमचे कायदेशीर परवाने घेतल्यास त्यांना शासनास कर द्यावा लागतो, पण हा कर चुकविण्यासाठी काही हॉटेल चालक कायदेशीर परवाने घेण्यापेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत साधने हॉटेल चालकांना फायदेशीर ठरते. अधिकाऱ्यांनादेखील याचा फायदाच होत असल्याने ते देखील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स चालकांवर कारवाई देखील करीत नाहीत. आणि जर कारवाई करण्याची वेळ आलीच तर हॉटेलमधील वेटरवर दहा-बारा दारूच्या बाटल्या मिळाल्याची नाममात्र कारवाई केली जाते.कारवाईचा दिखावा करून पोलीस नामानिराळे
होत आहेत.

ग्रामीण भागात बेकादेशीर दारू विक्री होत असलेल्या ढाब्यांवर तळीराम व ढाबे चालक यांच्यात अनेकदा वादावादी होऊन भांडणातून गंभीर गुन्हे घडत असतात. अशावेळी हॉटेल्स, ढाबे चालकांना पोलीस अभय देऊन दारू पिणाऱ्यांवरच पोलीस गुन्हे दाखल करतात. त्यावेळी त्या ठिकाणी होणारी बेकायदेशीर दारू विक्रीकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. पोलिसांच्या या सोयीस्करपणे होणाऱ्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीरित्या दारू विक्री
फोफावत आहे.

मावळातील हॉटेल व ग्रामीण भागातील चायनीजच्या टपऱ्यांवर बेकायदेशीर दारू विक्री सुरू असताना त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई का करत नाही, असे अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून अपुऱ्या मनुष्य बळाचे कारण पुढे केले जाते, मात्र “वसुली’साठी पोलीस यंत्रणा वेळेत पोहोचते, असा सवाल संतप्त व्यावसायिक, नागरिक उपस्थित करीत आहेत.

कार्यकर्त्यांची खास बडदास्त – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सर्व बेकायदेशीर गोष्टींवर अधिक लक्ष ठेवले जाते. निवडणुकीत पैसा आणि दारू ही महत्त्वाची ठरू शकते. निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून दारू आणल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत आढळून आले आहे. गावगावचा दौरा करणाऱ्या कार्यकर्त्यांची “विदेशी’ देऊन खास बडदास्त ठेवली जाते. त्यासाठी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात दारूची मागणी असते. निवडणूक काळात बेकायदेशीर दारू, पैसा या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मावळात खुलेआम दारूविक्री होत असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई केलेली दिसत नाही.

परवान्यापेक्षा हप्ता परवडला –

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कानाडोळा केल्यामुळे मावळात बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू विक्रीचा परिसरातील परवानाधारक बार, परमिट रूम चालकांवर विपरीत परिणाम होत आहे. मद्य विक्रीचा परवाना घेण्यापेक्षा हप्ते देऊन दारू विक्री करणे परवडत असल्याचे काही परवानाधारकांचे म्हणणे आहे. मावळातील पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांच्या तडजोडीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, त्यामुळे मावळात सुरू असलेली बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे, असे नागरिक आणि परवानाधारकांचे
म्हणणे आहे.

तळेगाव विभागात मावळ आणि खेड हे दोन तालुके आहेत. दोन्ही तालुक्‍यांचे कार्यक्षेत्राच्या तुलनेत कार्यालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे सर्वत्र नियंत्रण ठेवणे अशक्‍य झाले आहे. कार्यालयीन मंजूर मनुष्यबळ केवळ आठ आहे. आता वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्‍त मनुष्यबळाच्या मागणीसाठी मर्यादा येतात. तर दुसरीकडे पुरेशा मनुष्यबळाअभावी अपेक्षित कारवाई होत नाही. तरीही अवैध दारू विक्रीसंदर्भात नागरिकांची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती तळेगाव विभाागाचे निरीक्षक राजाराम खोत यानी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.