रक्तदाब (बीपी) व त्यावरील उपचाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. या गरसमजांना समजून घेऊन त्यांना दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आरोग्यासाठी यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. ८ सामान्य गैरसमज आणि या प्रत्येक गैरसमजामागील सत्य जाणून घेऊया.
गैरसमज : रक्तदाबाला प्रतिबंध करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही.
सत्य : एखाद्या व्यक्तीमध्ये रक्तदाबाची अधिक धोकादायक लक्षणे दिसून येत असली, तरी योग्य प्रकारे केलेले प्रतिबंधात्मक उपचार उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासोबतच त्यावर प्रतिबंध करण्यामध्ये मदत करू शकतात. या उपचारामध्ये वाढणा-या वजनावर नियंत्रण, आरोग्यदायी खाण्याच्या सवयी, मीठाचे कमी प्रमाणात सेवन, नियमित व्यायाम आणि कोणत्याही गोष्टीचा ताण न घेणे यांचा समावेश आहे.
गैरसमज : उच्च रक्तदाबाची एक अॅब्नॉर्मल रिडिंग म्हणजे मला उच्च रक्तदाब आहे.
सत्य : एक अॅब्नॉर्मल रिडिंग पुरेशी नाही. डॉक्टर रक्तदाबाच्या विविध रिडिंग्ज घेतल्यानंतरच उच्च रक्तदाबाचे निदान करू शकतात.
गैरसमज : मी जेवताना वरून मीठ घेत नाही, म्हणजे मी मीठ सेवनाच्या बाबतीत नियंत्रण ठेवतो.
सत्य : आपण सेवन करत असलेले ७५ टक्के मीठ हे सॉसेस, सुप्स, डबा बंद पदार्थ, लोणी व चीज अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये असते. ते जेवताना वापरण्यात येणारे मीठ किंवा घरामध्ये बनवलेल्या जेवणामध्ये नसते.
गैरसमज : असंतुलित आहार व व्यायामाच्या अभावामुळेच उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
सत्य : निश्चितच आहार व जीवनशैलीचा आपल्या रक्तदाबावर परिणाम होतो. पण वय, आनुवांशिक इतिहास व वांशिकता यांसारखे काही न बदलता येणारे धोकादायक घटक आहेत, जे रक्तदाब होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
गैरसमज : नेहमीच्या मीठाऐवजीसी सॉल्ट / रॉक सॉल्ट / पिंक सॉल्टचा वापर करावा. कारण, त्यामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असते.
सत्य : रासायनिकदृष्टय़ा या सर्व प्रकाराच्या मिठांमध्ये सोडिअमचे प्रमाण समान असते.
गैरसमज : उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, अस्वस्थता, घाम येणे व अपुरी झोप ही लक्षणे दिसून येतात. माझ्यामध्ये ही लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणजे मला उच्च रक्तदाबाचा त्रास नाही.
सत्य : अनेकवेळा उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येत नाहीत. सामान्यत: नियमित रक्तदाब तपासणीदरम्यानच उच्च रक्तदाब समजतो.
गैरसमज : मला घरी रक्तदाब तपासण्याची गरज नाही.
सत्य : घरी ईझी-टू-ऑपरेट बीपी मॉनिटर असणे नेहमीच चांगले. यामुळे तुम्हाला रक्तदाबाबाबत माहिती मिळण्यामध्ये मदत होईल. तसेच डॉक्टरांना औषधोपचार करण्यामध्ये किंवा आवश्यकतेनुसार औषधाचा डोस देण्यातही मदत होईल.
गैरसमज : माझा रक्तदाब नियंत्रणामध्ये आल्यानंतर मी औषधे घेणे थांबवू शकतो.
सत्य : उच्च रक्तदाबासाठी औषधोपचार सुरू झाल्यानंतर जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत, बहुधा आयुष्यभर ती औषधे घेणे गरजेचे असते. अचानक रक्तदाबाची औषधे घेणे थांबवल्याने ‘रिबाऊंड हायपरटेन्शन’ होऊ शकते, जे धोकादायक असू शकते.