व्हिडिओ कॉल उचलताय तर मग सावधान…! त्याआधी ही बातमी वाचाच

ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले : शहरातील 20 जणांनी केल्या तक्रारी


अश्‍लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

पिंपरी – अनोळखी नंबरवरून आलेला व्हिडिओ कॉल उचलणे शहरातील 20 जणांना चांगलेच महागात पडले आहे. नागरिकांचे व्हिडिओ कॉल एडिट करून अश्‍लील चित्रफितीत परिवर्तीत करण्यात आले आहे. त्यानंतर ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी त्या नागरिकांकडे हजारो रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

शहरातील एका तरुणाला एका अनोळखी तरुणीकडून आलेली फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारली. त्यानंतर चॅटिंगला सुरुवात झाली आणि मोबाइल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. त्यानंतर त्या तरुणीकडून व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलवर त्या तरुणीने कपडे काढण्यास सुरुवात केली आणि तरुणालाही तसे करण्यास सांगितले. मात्र, समोरचे अश्‍लील दृश्‍य बघून तो गडबडून गेला आणि त्याने व्हिडिओ कॉल लगेच कट केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी आपले काम साधून घेतले.

व्हिडिओ कॉल घेतल्यानंतर काही क्षणांसाठी सायबर गुन्हेगारांना तरुणाचा चेहरा दिसला. त्याने तो व्हिडिओ कॉल एडिट केला. सुरुवातीला त्या तरुणाचा चेहरा दाखवून त्यानंतर कोणाचीतरी अश्‍लील क्‍लीप त्याला जोडली. नव्याने तयार केलेली क्‍लीप तरुणाला पाठविली.

स्वत:ची अश्‍लील क्‍लीप पाहून तरुणाच्या पायाखालची माती सरकली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तरुणाशी संपर्क करून 30 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ती अश्‍लील चित्रफीत मित्र, नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील 20 जणांच्या बाबतीत घडला आहे. याबाबत सायबर विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अश्‍लील क्‍लीप व्हायरल करण्याची धमकी देत सायबर गुन्हेगार पैशाची मागणी करतात. एकदा पैशाची मागणी पूर्ण केल्यास ते वारंवार पैशाची मागणी करतात. जर कोणाच्या बाबतीत असा प्रकार घडत असेल तर त्वरित सायबर विभागात तक्रार करा. तक्रार करणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवले जाते.
– प्रेरणा कट्टे, सहायक आयुक्‍त-गुन्हे शाखा

हे करा
* सोशल मीडियावरील आपले खाते इतरांसाठी लॉक करा
* पडताळणी शिवाय सोशल मीडियावरील फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारू नका
* अनोळखी व्यक्‍तीला आपला मोबाइल नंबर देऊ नका
* सोशल मीडियावरून येणारे अनोळखी व्हिडिओ कॉल स्वीकारू नका
* व्हिडिओ कॉल स्वीकरायचा झाल्यास फ्रंट कॅमेऱ्यावर बोट ठेवून तुमचा व्हिडिओ बंद करा
* बदनामीच्या भीतीला घाबरून कोणालाही पैसे देऊ नका; एकदा पैसे दिल्यास पैशाची मागणी वाढते
* आपल्याबाबत अनुचित प्रकार घडल्यास सायबर विभागाला माहिती द्या

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.