नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वीडिश कंपनीने आलिशान बस दिल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले. मात्र, ते वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले.
स्वीडनमधील स्कॅनिया या बसनिर्मिती करणाऱ्या कंपनीने नोव्हेंबर 2016 मध्ये गडकरी यांच्या मुलांशी संबंधित कंपनीला आलिशान बस दिली. ती बस घेण्यासाठी पैसे देण्यात आले नाहीत. त्या बसचा वापर गडकरी यांच्या कन्येच्या विवाहावेळी करण्यात आला, असे संबंधित वृत्तामध्ये नमूद करण्यात आले. मात्र, बसविषयीचे आरोप फेटाळताना गडकरी यांच्या कार्यालयाने संबंधित वृत्त म्हणजे प्रसारमाध्यमांचा कल्पनाविलास असल्याचे म्हटले आहे.
संबंधित बसविषयीचा व्यवहार स्कॅनिया कंपनीचा अंतर्गत मामला आहे. गडकरी आणि त्यांच्या कुटूंबीयांशी त्याचा काहीच संबंध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गडकरी यांना खासगी वापरासाठी कुठली बस दिल्याचा स्कॅनियानेही इन्कार केल्याचे समजते.