मुंबई – शिवसेनेच्या (शिंदे गट) एका जाहिरातामुळे कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल मंगळवारी देशातील प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शिवसेनेची जाहिरात होती. जाहिरातीत “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” असा संदेशही देण्यात आला होता. यात एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उच्च स्थान देण्यात आले होते. यावरून भाजपसह अनेक नेत्यांनी शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आज त्यांनी चांगल्या भावनेने जाहिरात दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. काल आलेल्या जाहिरातीत कोणीतरी खोडसाळपणा केला होता. आज तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला ही आमच्यासाठी आणि युतीसाठी चांगली गोष्ट आहे. शिंदे गटाची भावना वाईट असती तर त्यांनी आजची सुधारीत जाहिरात दिली नसती. आमच्याकडून चूक झाली तर आम्ही दुरुस्त करणार त्यांच्याकडून चूक झाली तर ते दुरुस्त करणार. कोणीतरी छोट व्हावं कुणीतरी मोठं व्हावं. आमच्यात मतभेद असतील पण मनभेद नाहीत.”
पुढे ते म्हणाले, “देवेंद्रजी यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी होते यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं, त्यामुळे कार्यकर्ते चिडले आहेत. काल दिलेली जाहिरात ही कोणी दिली हे अजुनही समोर आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणे चुकीचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता हा विषय संपला आहे. एकनाथ शिंदे छोट्या मनाचे नाहीत, त्यामुळे ते असं करणार नाहीत. मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहे.”
नेमकी काय होती जाहिरात ?
शिवसेनेने (शिंदे गट) दिलेल्य सर्व वृत्तपत्रांमध्ये ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची शीर्षक देऊन जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना 26.1 टक्के आणि देवेंद्र फडणवीसांना 23.2 टक्के जनतेची पसंती देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.