करोना लसीविषयीचे आक्षेप दूर करण्याचा आयसीएमआरचा प्रयत्न

अनावश्‍यक लाल फितीचा कारभार टाळण्याचा उद्देश

नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) करोनावरील लस उपलब्ध करण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत निश्‍चित केल्यावर विविध स्तरांतून आक्षेप घेतले जात आहेत. त्या आक्षेपांद्वारे उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करण्यासाठी आयसीएमआरने शनिवारी स्पष्टीकरण दिले. अनावश्‍यक लाल फितीचा कारभार टाळण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्या संस्थेने म्हटले.

आवश्‍यक प्रक्रिया न टाळता लस विकसित करण्याला गती मिळावी असा आमचा हेतू आहे. सार्वजनिक आरोग्याचे व्यापक हित ध्यानात घेऊन लसीच्या चाचण्या वेगाने सुरू होणे महत्वाचे आहे. आमची प्रक्रिया जागतिक स्तरावरील मापदंडांना अनुसरून अशीच आहे. देशातील जनतेच्या हिताला आणि सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी भूमिका आयसीएमआरने एका निवेदनाद्वारे मांडली.

करोनावरील लसीसाठी मुदत निश्‍चित करण्यात आल्याची बातमी पुढे आल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. इतक्‍या लवकर लस विकसित होण्याबाबत वैद्यकीय तज्ञांकडून शंका उपस्थित करण्यात आली. त्याशिवाय, मोदी सरकारच्या राजकीय लाभासाठी घाई केली जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.