कोकणात मान्सूनचा जोर वाढला

नद्यांची पाणीपातळी वाढल्याने अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती

मुंबई – कोकणात मान्सूनचा जोर वाढला असून दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे जाण्यायेण्याचे मार्ग बंद झाले असून अनेक ठिकाणीची वीजही गेली आहे. यामुळे पुन्हा एकदा कोकणाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवलीत महामार्गाच्या धोकादायक भिंतीजवळ सर्व्हिस मार्गाच्या भिंतीला भगदाड पडले असून या ठिकाणी मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. जिल्ह्यात सात जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवलीतही गेले 24 तास जोरदार पाऊस कोसळत आहे. कणकवलीतील जाणवली आणि गड या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. तळकोकणातील मालवण तालुक्‍यात सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कालावल खाडीपात्रलगत असलेल्या खोत जुवा बेटावर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढत चालला असल्याने भरवस्तीत पाणी शिरले आहे.

रत्नागिरी जिल्हामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर या दोन तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने बाजारपुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदी पात्रजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत
यावर्षी दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत कोसळला आहे. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. यंदाही आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत 70 इंच पाऊस आंबोलीत पडला आहे. म्हणजे साधारणपणे 1700 ते 1800 मी. मी. पेक्षा जास्त पाऊस आंबोलीत पडला आहे. त्यामुळे याठिकाणी लहान मोठे धबधबे या आंबोलीच्या घाटात प्रवाहित झालेले पाहायला मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.