नवी दिल्ली :- पाच ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी माझ्याकडून अनेकांना अपेक्षा आहेत, हे मला माहिती आहे. मात्र, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणावमुक्त राहणे आणि विश्वचषकापूर्वी मी ज्या स्थितीत होतो त्या स्थितीत मला परत जायचे आहे. स्वत:ला कसे तणावमुक्त ठेवावे आणि बाहेर सुरु असणाऱ्या गोष्टींचा जास्त कसा, सकारात्मक वा नकारात्मक विचार करू नये, यावर मी लक्ष केंद्रित करत आहे, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रोहित बोलत होता.
रोहित पुढे म्हणाला की, मी सध्या स्वतः ला मानसिकदृष्ट्या प्रसन्न ठेवत आहे. माध्यमांतून येत असलेल्या कोणत्याही माहितीने मी विचलित होत नाही. वर्ष 2019 च्या विश्वचषकापूर्वी मी खूप प्रसन्न मनाने क्रिकेट खेळलो होतो. त्यावेळी कुठलाही दबाव माझ्यावर नव्हता. कारण त्यावेळी मी टीम इंडियाचा कर्णधार नव्हतो. त्यावेळी माझी मानसिक स्थिती चांगली होती आणि मी स्पर्धेसाठी चांगली तयारी केली होती, तीच गोष्ट आता मी करत आहे.
विशेष म्हणजे, रोहितने त्या वर्ल्ड कपमध्ये पाच शतकांसह 648 धावा केल्या होत्या. यासह तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
रोहित पुढे म्हणाला, आगामी विश्वचषकापूर्वी एक क्रिकेटर म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मी कोणत्या योग्य गोष्टी करत होतो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटत नाही की एक निकाल किंवा चॅम्पियनशिप एक व्यक्ती म्हणून मला बदलू शकेल. मी गेल्या 16 वर्षात एक व्यक्ती म्हणून बदललो नाही आणि त्या आघाडीवर मला काहीही बदलण्याची गरज वाटत नाही. मी जशी फलंदाजी करत आलो पुढेही तशीच करत राहीन.
येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 ला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे.