हैदराबाद – हैदराबादेतील पशूवैद्य महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी हजगर्जीपणा दाखवल्याबद्दल तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही महिला बेपत्ता होण्याची “एफआयआर’ नोंदवून घेण्यास उशीर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित तरुणीवर बलात्कार आणि हत्या झाल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. हे प्रकरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्याच्या मुद्दयावरून पोलिसांनी “एफआयआर’ नोंदवून घेण्यास दिरंगाई केली होती.
या तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी केल्यावर पोलिसांनी त्वरित कार्यवाही न केल्याचे निदर्शनास आले होते, असे सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी. सज्जानार यांनी सांगितले. सविस्तर चौकशीनंतर पोलीस उप निरीक्षक आणि दोन हवालदारांना शनिवारी निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दखलपात्र गुन्ह्याची तक्रार आल्यावर हद्दीची सबब देऊन तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात येऊ नये, अशी सूचना पुन्हा एकदा पोलीस स्थानकांना देण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
सरकारी पशू रुग्णालयामध्ये सहायक पशूवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलेचा जळालेला मृतदेह शादनगर येथे गुरुवारी आढळला होता. ही तरुणी बुधवारी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.