नवी दिल्ली – पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनच्या संभाव्य वापराविरोधातील तांत्रिक उपाय योजना करण्यासाठी सीमा सुरक्षा दल प्रयत्नशील आहे, असे “बीएसएफ’चे महासंचालक व्ही.के. जोहरी यांनी म्हटले आहे.
“बीएसएफ’ने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या 6 हजार 386 किलोमीटरच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि गुप्तचरांचे जाळे अधिक व्यापक केले आहे, असेही त्यांने सांगितले. “बीएसएफ’च्या 55 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून “बीएसएफ’ला शुभेच्छा
“बीएसएफ रायझिंग डे’ निमित्त सीमा सुरक्षा दलाच्या सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्यावतीने शुभेच्छा. आपल्या सीमा सुरक्षित रहाव्यात यासाठी या दलाचे जवान अथक परिश्रम करीत आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान नेहमीच अतिशय मेहनत करतात आणि आपल्या देशाच्या नागरिकांची सेवा करतात. सीमा सुरक्षा जवान परिवाराला माझ्या सदिच्छा!” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
काश्मीरमधील प्रत्यक्ष ताबा रेषा आणि पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा अलिकडच्या काळात खूपच संवेदनशील बनल्या आहेत. पश्चिम सीमेजवळ ड्रोनचा वापर होत असल्याची माहिती मिलाली आहे. हा मुद्दा हाताळण्यासाठी काही तांत्रिक उपाय योजना करण्यासाठी “बीएसएफ’ प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
भारतविरोधी गटांकडून सातत्याने सीमा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असतो. मात्र हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी “बीएसएफ’सततच सतर्क आहे. असेही त्यांनी सांगितले. “बीएसएफ’ची स्थापना 1965 साली झाली आणि या दलात 2.5 लाख जवान सीमेवर तैनात असतात.