नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीला अपघात झाला आहे. हा अपघात जालौन येथे घडला. भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनरची ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात फॉर्च्युनरचे नुकसान झाले असून केशव मौर्य यांचा मुलगा योगेश मौर्य अपघातात बालंबाल बचावला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. काल्पी कोतवाली परिसरातील आलमपूर बायपासजवळ हा अपघात झाला.
दरम्यान, शुक्रवारी केशव प्रसाद मौर्य यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केशव प्रसाद मौर्य हे सिरथू विधानसभेचे उमेदवार होते पण त्यांना सपाच्या पल्लवी पटेल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत पक्षाने उपमुख्यमंत्रीपदाची कमान त्यांच्याकडे सोपवली आहे.