भाटघर -पिसावरे (ता. भोर) येथील हुमजाई मातेची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या तीन दिवसांमध्ये भक्तजनांसाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत महाप्रसाद दिला जातो.
या यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. या यात्रेनिमित्त तीन दिवसात अंदाजे वीस हजार यात्रेकरूंनी हजेरी लावली. या गावात वर्षभरात ग्रामदैवत काळभैरवनाथ व हुमजाई देवीची यात्रा अशी दोन वेळा यात्रा गावात भरली जाते.
यात्रेच्या तीन दिवसांमध्ये होम हवन, महापूजा, धार्मिक विधी, ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाला पोषाख व श्रींचे दर्शन सोहळा, काठी पालखी सोहळा, ग्राम दक्षिणा, ढोल-लेझीम स्पर्धा, अभिषेक, लोकनाट्य तमाशा, ऑर्केस्ट्रा व कीर्तनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम करण्यात आले, अशी माहिती हुमजाई माता कमिटी व ग्रामस्थांनी दिली.