जीवनगाणे: माणसाचा रोकडा धर्म

अरुण गोखले

आपण प्रत्येकजण जन्माबरोबरच जसे कौटुंबिक कर्तव्यांशी बांधलेले असतो तसेच ज्या समाजात आपण घडतो, वाढतो, ज्या समाजाचा आपण एक घटक असतो त्या सभोवतीच्या समाजाबद्दलही काही कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर येतेच. माणूस ह्या नात्याने आपले सामाजिक कर्तव्य काय? हे सांगताना संत गाडगे महाराज आपल्याला सांगतात की, माणसा! तू तुझा रोकडा धर्म सांभाळ, त्याचं पालन कर.

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हे आपल्याला कळते. पण माणसाचा रोकडाधर्म कोणता? हे आपल्याला कळत नाही. तो रोकडा माणुसकीचा धर्म कोणता? हे सांगताना गाडगेबाबा सांगतात की, जात, धर्म पंथ ह्याचा विचार न करता जो कोणी भुकेला आहे, त्याला अन्न दे. जो जीव तहानलेला आहे, अशा जीवाची तहान भागवं. मग ती तहान पाण्याची असेल, प्रेमाची असेल, आपुलकीची असेल ती ओळखून, त्याला ते देऊन त्याची तहान भागवं. ज्यांना अंगभर वस्त्र नाही त्यांना निदान आपल्या अंगावरचा जुना कपडा तरी देऊन त्यांची उघडी पडणारी लाज राख.

ते सांगतात, पोटाची जशी भूक भागायला हवी तशीच ज्ञानार्जनाची भूकही भागायला हवी. त्यासाठी लोकांना शिक्षण देऊन, साक्षर करायला हवे. निरक्षरतेपोटी होणारी त्यांची फसवणूक, त्यांच्या गळ्यात पडणारे सावकारीचे पाश, निराशेने, दारिद्य्राने, असाहाय्यतेने गळ्यात येणारे आत्महत्येचे दोर हे आपण तोडायला हवेत. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडून देऊन त्यांच्या जीवनातला अज्ञानाचा अंधार ज्ञानज्योतीने दूर करायला हवा.

ज्यांना निवारा नाही त्यांच्या डोक्‍यावर छप्पर उभं करून द्यायला हवं. ज्यांना आसरा नाही त्यांना आसरा द्यायला हवा. अंध अपंग, दु:खीकष्टी जीवांना मायेच्या ममतेने मदत करायला हवी. सहकार्याचा हात पुढे करायला हवा. आपल्या जिभेचे चोचले भागवण्यासाठी मुक्‍याप्राण्यांची हत्या थांबवायला हवी. मुक्‍या प्राण्यांवर प्रेम करायला हवं. गोरगरिबांचे संसार उभे करून द्यायला हवेत. त्यांच्या लग्नकार्यात मदत करायला हवी. आपल्या भोवतीच्या दु:खीकष्टी निराश झालेल्यांचे अश्रू पुसायला हवेत. त्यांना जगण्याची नवी उमेद द्यायला हवी.

माणसा! ह्यातलं जे आणि जेवढं करता येणार असेल ना, ते तू अवश्‍य कर. त्यातच तुझ्या जीवनाची खरी सार्थकता आहे. लोकसेवा हीच ईश्‍वराची खरी पूजा आणि गोरगरिबांचा आशीर्वादातच ईश्‍वरीकृपेचा प्रसाद लपलेला आहे, हे विसरू नकोस.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.