तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा
सातारा – सातारा शहरातील प्रभाग 20 मध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र कामाला गती नाही. पदाधिकारी व अधिकारी निवडणुकीत दंग झाले आहेत. गेले आठ दिवस झाले रस्त्यात खोदून ठेवले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाण्याची जलवाहिनी तुटली आहे. पाण्याची नासाडी होत आहे. तरीही पाणी पुरवठा विभागातील कुंभकर्णी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना जाग येत नाही. हे काम तातडीने पूर्ण केले नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा विरोधी नगर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. लीना गोरे यांनी बोलताना दिला आहे.
लीना गोरे म्हणाल्या, की भुयारी गटर योजनेच्या कामाला आमचा विरोध नाही. पण प्रभाग 20 मध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे, ते कासव गतीने सुरू आहे.
या कामासदर्भात अनेकदा मुख्याधिकारी शंकर गोरे आणि पदाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या, पण कोणीही गांभीर्याने घेत नाही. भुयारी गटाराच्या चेबरसाठी आठ दिवस ठेकेदाराने खड्डा खोदून ठेवला आहे. खड्डा खोदताना पाण्याची पाईप तुटली आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. कासमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तुटलेल्या पाईपलाईन मधून पाण्याचे कारंजे उडत आहेत. पाण्याची नासाडी होत असतानाही पाणी पुरवठा अधिकारी झोपा काढत आहेत का? त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच खड्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ठेकेदाराला सांगून ठेकेदार त्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. हे काम तातडीने पूर्ण केले नाही तर नाइलाजाने भुयारी गटार योजनेचे काम बंद पाडावे लागेल, असा इशारा विरोधी नगर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. लीना गोरे यांनी बोलताना दिला आहे.