गैरकारभाराच्या आरोपानंतर संस्थेकडून खुलासा
“हुजूरपागा बचाव कृती समिती’ने केला होता आरोप
पुणे – हुजूरपागा नियामक मंडळाने कोणताही गैरकारभार केलेला नाही. कायदेशीर व नियमाप्रमाणेच सर्व स्वच्छ कारभार सुरू आहे. या कारभाराबाबतची सर्व खरी कागदपत्रे उपलब्ध आहेत. पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने बिनबुडाचे आरोप केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गर्ल्स एज्यूकेशन सोसायटीच्या सचिव रेखा पळशीकर यांनी दिली.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नियमाप्रमाणेच झाली आहे. नियामक मंडळावर रितसर नियुक्त्या केल्या आहेत. सर्वसाधारण सभा वेळापत्रकानुसार होतात. जुन्या काळीच गाळे भाड्याने दिले होते. त्यामुळे त्याचे दर जूनेच होते. सन 2013 नंतर धर्मादाय आयुक्तांकडून रितसर परवानगी घेऊन गाळे भाड्याने दिले आहेत. जाहिरात देऊन अर्ज मागवूनच गाळे भाड्याने दिले असून याचा सर्व हिशोब चोख ठेवला आहे.
बिल्डींग कमिटी सदस्य म्हणवून घेणारे दीपक मेहता हे आता कोणत्याच समितीचे सदस्य नाहीत. ते संस्थेच्या चांगल्या कारभारात अडचणी निर्माण करीत आहे, असेही पळशीकर यांनी स्पष्ट केले. धर्मादाय आयुक्तांकडून चेंज रिपोर्ट घेऊनच कामकाज सुरू आहे. संस्थेने पारदर्शकपणे कारभार करत जागांची खरेदी केली आहे. शाळेला जागा अपुरी पडत असल्याने मांगडेवाडी येथे जागा खरेदी करून तात्पुरते बांधकाम केले. याला पीएमआरडीएने नोटीस पाठविली असली तरी त्यावर आवश्यक ती कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे शाळेच्या बांधकामावर कारवाईचे पत्र पुन्हा आलेले नाही, असेही पळशीकर यांनी सांगितले.
प्रशासक नेमण्याची मागणी
महाराष्ट्र गर्ल्स एज्यूकेशन सोसायटीच्या हुजूरपागा नियामक मंडळाचा गैरकारभार सुरू आहे. तो रोखण्यासाठी संस्थेवर प्रशासक नेमावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा “हुजूरपागा बचाव कृती समिती’ने पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्र गर्ल्स एज्यूकेशन सोसायटीच्या माजी अध्यक्षा शामा जाधव, सदस्य रुपाली पाटील-ठोंबरे, बिल्डींग कमिटी सदस्य दीपक मेहता, सामाजिक कार्यकर्त्या श्यामला देसाई आदींनी ही माहिती दिली. हुजूरपागा नियामक मंडळाच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी “हुजूरपागा बचाव कृती समिती’ स्थापन केली आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्थेच्या मालकीच्या व्यावसायिक जागा नाम मात्र भाड्याने देऊन संस्थेचे नुकसान करणे, नव्या जागा खरेदीमध्ये गैरव्यवहार, शिक्षक व कर्मचारी नियुक्तीत भ्रष्टाचार, नियामक मंडळावर अवैध नियुक्त्या करणे, नियामक मंडळाच्या सभा झाल्याची बोगस कागदपत्रे तयार करणे, नियामक मंडळातील सदस्यांना बेकायदेशीरपणे काढून टाकणे आदी प्रकार कृती समितीने उघड केले.
लक्ष्मी रस्त्यावरील संस्थेकडील चार एकर जागेपैकी निम्मी जागा 130 व्यावसायिक आस्थापनांना नाममात्र भाडे कराराने दिली आहे. या सर्व व्यवहारांसाठी धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेतली नाही. गाळेधारकांकडून पैशाचा हिशेब ठेवला नाही. सध्याच्या विश्वस्तांचे धर्मादाय कार्यालयाकडे 30 चेंज रिपोर्ट प्रलंबित असून नियमाप्रमाणे हे विश्वस्त कारभार पाहू शकत नाहीत. संस्थेच्या कात्रज, मांगडेवाडी गट नं. 16/4 येथील शाळेचे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नोटीसही बजावली आहे, असेही कृती समितीने स्पष्ट केले.