गटातटातून मढीत प्रथमच पेटल्या दोन होळ्या

पाथर्डी – भटक्‍या समाजाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील गोपाळ समाजाची मानाची होळी आज कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत. मात्र तणावाच्या वातावरणात पेटवण्यात आली. ही होळी पेटवण्याचा मान आम्हालाच द्या, अशी भूमिका घेणाऱ्या गोपाळ समाजहित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य होळीपूर्वी अर्धा तास अगोदर दुसरी होळी गडाच्या पायथ्याला पेटवल्याने मढी येथील यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच गोपाळ समाजाच्या दोन होळ्या पेटल्या.

आज वाद होणार, अशी शक्‍यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने मढी गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी, मढी येथील होळी पेटवण्याचा मान हा गोपाळ समाजाला असून ही होळी नेमकी कोणी पेटवायची यावरून वाद झाल्याने हा वाद 25 फेब्रुवारी 1999 ला पाथर्डी न्यायालयात मिटवण्यात आला होता. त्यावेळी ही होळी पेटवण्याचा मान हा गोपाळ समाजातील मानकरी माणिक लोणारे, जगन्नाथ माळी, हरिभाऊ हामरे, हरिदास काळापहाड, पुंडलिक नवघिरे, सुंदर गिर्हे यांना देण्यात आला.

तेव्हापासून हे मानकरी गोपाळ समाजाची होळी पेटवतात. मात्र चालू वर्षी गोपाळ समाजहित महासंघाने या मानकऱ्यांवर आक्षेप घेत ही होळी आम्हीच पेटवणार, अशी भूमिका घेतल्याने मढी येथील होळी नेमके कोण पेटवणार, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. मढी येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील हे सुद्धा उपस्थित होते. ही होळी पेटवण्यापूर्वी गोपाळ समाजाचा मेळावा मढी येथे पार पडला.

या वेळी काही युवकांनी होळी पेटवण्याचा मान हा नव्या मानकऱ्यांना द्यावा, अशी मागणी केल्यानंतर थोडा वाद निर्माण झाला. त्यानंतर गोपाळ समाजाची मुख्य होळी पेटवण्यापूर्वी मढी गावाचा पार असलेल्या ठिकाणी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी नाथांचा जयघोष करत होळी पेटवली व आम्हीच खरे मानकरी असल्याचा दावा केला. ही होळी पेटवताना महासंघाचे कार्यकर्ते अंकुश जाधव, संदीप जाधव, उमेश पवार, रमेश भोंगळे, नितीन गव्हाणे, सुखदेव पवार, दत्तात्रय भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ही होळी पेटवतना कोणताही वाद झाला नाही. त्यानंतर सध्याचे मानकरी मुख्य गडावर गेल्यानंतर देवस्थानच्या वतीने त्यांना देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे,
उपाध्यक्ष सुनील सानप, विश्वस्त मिलिंद चवंडके, आप्पासाहेब मरकड तसेच डॉ. रमाकांत मरकड यांनी मानाच्या गोवऱ्या दिल्यानंतर मंदिराच्या पायथ्याला येऊन सर्व मानकऱ्यांनी कानिफनाथांचा जयघोष करत मुख्य होळी पेटवेली.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी महासंघाचा विजय असो अशा घोषणाही दिल्या. दरवर्षी गोपाळ समाजाची होळी पेटवताना दहा ते बारा शेणाच्या गोवऱ्या ठेऊन होळी पेटवली जाते मात्र चालू वर्षी शेकडो गोवऱ्या रचून होळी पेटवण्यात आली. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.