कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी मानसिकता बदलावी

कर्जत  – महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपली मानसिकता बदलून महावितरणची थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

कर्जत तालुक्‍यातील माहिजळगाव येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत विस्तारित समाधान योजना, सृजन शासकीय योजना शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिबिराचे आयोजक आ. रोहित पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड, बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी आमदार राहुल जगताप, घनश्‍याम शेलार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रांताधिकारी अर्चना नष्टे उपस्थिती होते.

ना. पवार म्हणाले, कर्जत-जामखेड तालुक्‍यांच्या विकासासाठी तसेच येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, रस्त्यांच्या पायाभूत विकासासाठी आवश्‍यक भरीव निधी उपलब्ध करुन देणार आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुकाई चारी, कुकडी चारीचे काम, पिण्याच्या पाण्याच्या योजना, चौंडी तीर्थक्षेत्र विकास, कर्जत आणि जामखेड येथे स्वतंत्र एमआयडीसी, अद्ययावत बसस्थानक यासाठी निधीची तरतूद करून देणार असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी नियोजन  मंडळाच्या निधीतून वाढीव निधी उपलब्ध करून दिला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, योजनांच्या लाभाचे पत्र प्रदान करण्यात आले. या महाराजस्व अभियान प्रसंगी महसूल, सामाजिक वनीकरण, परिवहन, कृषी, आरोग्य शिक्षण, भूमिअभिलेख यासह विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. कर्जत व जामखेडला स्वतंत्र एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा पहिले सर्वेक्षण झाले आहे. 30 वर्षांपासूनचा एसटी डेपोचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावला आहे, असे आ. रोहित पवार म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.