नवी दिल्ली – विमान कंपन्यावर कर्जाचा प्रचंड बोजा आहे. ओमायक्रॉनमुळे विमान प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. अशातच विमानाच्या इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. या किमती आवाक्यात ठेवण्यासाठी विमानाच्या इंधनाचा जीएसटीत समावेश करण्याची गरज असल्याचे स्पाईस जेट कंपनीचे संस्थापक अजय सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सांगितले.
असाचेम या उद्योजकाच्या संघटनेच्या बैठकीवेळी सिंह यांनी सीतारामन यांना विमान इंधन स्वस्त होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. सीतारामन यांनी जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत हा विषय चर्चेसाठी मांडला जाईल असे सांगितले. विमानाचे इंधन जीएसटीत नसल्यामुळे केंद्राबरोबरच राज्याचे अनेक कर या इंधनावर लागतात. त्यामुळे विमान कंपन्या अडचणीत आल्या असल्याचे सीतारामन यांनी मान्य केले.
विमानाच्या इंधनावर जास्त जीएसटी असताना जागतिक पातळीवर क्रुड महागले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन वर्षापासून भारतातील विमान कंपन्यासमोर अनेक अडचणी आल्यामुळे विमान कंपन्यांचे ताळेबंद बिघडले आहेत. याची जाणीव आपल्याला आहे. या क्षेत्राबरोबर चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
बॅंकांना मदत करण्यास सांगणार
एकीकडे विमान कंपन्यावर कर्जाचा बोजा वाढला असताना महसूल कमी झाला आहे. मात्र अडचणीत असलेल्या विमान कंपन्यांना बॅंका सहजासहजी मदत करीत नाहीत. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्राला प्राधान्य क्रमाचा किंवा पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सीतारामन यांनी आपण या संदर्भात बॅंकर्सबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले.