कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सोमवारी उत्तर प्रदेशात दाखल झाल्या. विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा (सप) प्रचार करण्यासाठी त्या उत्तर प्रदेशच्या रणांगणात उतरणार आहेत.
सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ममतांची उद्या (मंगळवार) लखनौमध्ये संयुक्तपत्रकार परिषद होईल. त्याशिवाय त्यांची व्हर्च्युअल सभाही होणार आहे. लखनौला रवाना होण्याआधी पत्रकारांशी बोलताना ममतांनी अखिलेश यांच्या निमंत्रणावरून सपच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करून अखिलेश सत्तेवर यावेत अशी तृणमूलची इच्छा आहे. भाजपविरोधी लढ्यात अखिलेश यांना व्यापक पाठिंबा मिळायला हवा. त्यामुळेच उत्तर प्रदेशची निवडणूक न लढवण्याचा निर्णय तृणमूलने घेतला, असे त्या म्हणाल्या. ममता आणि अखिलेश यांच्यात सलोख्याचे राजकीय संबंध आहेत.
त्यातून सपने बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलला पाठिंबा जाहीर केला होता. आता तृणमूल उत्तर प्रदेशात सपच्या पाठीशी उभा राहिला आहे. उत्तर प्रदेशात सत्तारूढ भाजप आणि सपमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.