ती कळते; पण सांगता येत नाही…

आरशात ज्या प्रमाणे आपले प्रतिबिंब उमटते, त्याचप्रमाणे चित्रपटांतही समाजाचे उमटते. समाजात जशा चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती असतात त्याच पडद्यावरची जागाही व्यापतात. मात्र एक खरे की चांगले असेल तर वाईटही असते. अन वाईट असेल तेथे चांगलेही असते.

प्रत्येकाच्या आयुष्याला एक साधारण गती असते. प्रत्येकाच्या जिवनात अचाट गोष्टी घडत नाहीत. कारण जन्माला येणारे सगळेच काही युगपुरूष नसतात. कायमस्वरूपी आपला ठसा उमटवून जातील अशी कार्येही त्यांच्या हातून कधी घडत नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांची दखल घेत नाही.

मात्र काही लोकांचे जिवन एक वस्तुपाठ असतो. त्यांना अदभूत शक्ती परमेश्‍वराने प्रदान केलेली असते. ते गेल्यानंतरही शतकानुशतके ते वंदनीय आणि पूजनीय ठरतात. पण सर्वसामान्यांचे काय? त्यांचे आयुष्य निरसच असते असे नाही. त्यातही चढ उतार असतात. नाट्यमय घडामोडी असतात. वादळ प्रसंगी उदभवलेली असतात. त्याला त्यांनी धीराने तोंड देत त्यावर मात केली असती. किंवा ज्या गोष्टीवर मात करूच शकत नाही त्या स्विकारल्या असतात.

आयुष्य जगायची त्यांची एक रित आहे. ते भरभरून जगण्याची कला काहींनी आत्मसात केली आहे. तोंड वेंगाडुन उगाचच आडोशाला जाउन बसणाऱ्यांनाही त्यांनी कळत न कळत जिवनाच्या या चैतन्यमय प्रवासात सहभागी करून घेतले आहे.
ही आणि अशी माणसे आपल्याभोवती असतात. फक्त त्यांच्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. गर्दीतून त्यांना हेरले पाहिजे. थोडा त्यांच्यावरही प्रकाशाचा तिरीप पडला पाहिजे.

हृषिकेश मुखर्जी अर्थात हृषिदांना ते जमले. त्यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यातील खेळकर, गमतीशीर, मजेशीर प्रसंग घेतले. त्यांनाच त्याचे नायक अथवा नायिका केले. त्यांच्या जिवनात आलेल्या गंभीरातील गंभीर प्रसंगानाही त्यांनी जागा दिली. या प्रसंगांचा सामना करताना या सर्वसामान्य व्यक्तींच्या असामान्य कामगिरीची हृदयस्पर्शी कथा टीपली व ती प्रेक्षकांसमोर मांडली.

मुखर्जींचे लेखक, दिग्दर्शक म्हणून असे अनेक चित्रपट आहेत जे कायम स्मरणात राहतात. त्याचा उहापोह करायला गेलो तर शब्द, जागा आणि कदाचित बरीच वर्षे सरून जातील. मात्र त्यांच्या काही निवडक चित्रपटांविषयी…

मिली:
ती एक खेळकर, एखाद्या वाहत्या झऱ्यासारखी. जिवनातील प्रत्येक क्षण पूरेपूर जगण्याची इच्छा असणारी. प्रत्येक लहान सहान गोष्टीत आनंद शोधणारी. मोठेपणाचे ओझे डोक्‍यावर वागवून फिरणाऱ्यांच्या डोक्‍यावरचे हे मोठेपण त्यांच्याही न कळत उतरवून त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेणारी.

तो एक हताश, निराश दुखावलेला. कलाकार असूनही कलेत रमण्यासही घाबरणारा. काहीसा व्यसनाकडे झुकलेला. कुठेतरी त्या पेल्यात स्वत:ला आणि स्वत:च्या दु:खाला बुडवू पाहणारा. स्वत:वर आणि इतरांवर चिडलेला. हसणे, खेळणे, छोट्या गोष्टींत आनंद शोधणे त्याला डाचते. त्याला हा अर्थहीन गोंगाट वाटतो. तो चिडतो. त्याला त्याचच कोषात राहायचे असते. अंधरात स्वत:लाच कुरवाळायचे असते.

तिचा पिता तिच्यासारखाच हसमुख. वेदना चेहऱ्यावर न दाखवणारा. तिच्या प्रत्येक हट्टापुढे आनंदाने माघार घेणारा. तीच त्याचा प्राणवायू. तिच्यावर कदाचित त्याने स्वत:पेक्षा जास्त प्रेम केले आहे. करतो आहे. मात्र त्याच्या प्रसन्न हास्यालाही दु:खाची एक किनार आहे. एक छटा आहे. ती लपवण्याचा तो प्रयत्न करतोय. मात्र कधीतरी ती डोकावतेच.

त्याला कारण तिला एका असाध्य रोगाने ग्रासले आहे. हा आजार तिला आपल्या कवेतच घेउन जाणारा आहे. तिला फार थोडाच वेळ त्याने आता आवर सावर करायला दिला आहे. मात्र तिला जगायचे आहे. आनंदाने…प्रेमाने आणि पूर्ण उत्साहाने; पण…

तो तिच्या इमारतीतच राहायला येतो आणि त्याची व तिची भेट होते. नंतर फुलत जाते एक हळुवार, समंजस, संवेदनशील असे नाते. त्यात तो धाडसी निर्णय घेतो. तिच्याशी लग्न करण्याचे तो ठरवतो. तिला जगातल्या मोठ्यात मोठ्या डॉक्‍टरकडे दाखवून या आजारातून बाहेर काढण्याच्या जीद्दीला तो पेटला असतो..

हृषिदांच्या या चित्रपटातले ते तीन म्हणजे जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि अशोक कुमार. अभिनयातली दादागिरी काय असते आणि त्याला योग्य न्याय देणारा आणि जागा देणारा दिग्दर्शक मिळाला तर काय होते, हे हृषिदांचा हा चित्रपट पाहिल्यावर कळते.

केवळ कळते, अनुभवता येते. मात्र शब्दांत सांगता येत नाही. त्यामुळे मिली ही दादांची एक अप्रतिम कलाकृती म्हणून स्मरणात रहाते.

(क्रमशः )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.