मनोज गायकवाड
मुंढवा – पुणे-सोलापूर महामार्ग, पुणे स्टेशन आणि पुणे-नगर महामार्गाला जोडणाऱ्या येथील महात्मा फुले चौकाचे रुंदीकरण भुसंपादनाअभावी रखडलेले असताना मुंढव्यातून मेट्रो कशी जाणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. महापालिकेकडून मेट्रोच्या नव्या दोन टप्प्यांना मान्यतेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला यामार्गाचाही समावेश आहे.
याशिवाय वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचे कामही पुढील टप्प्यात होणार आहे. यापैकी खराडी-हडपसर या मेट्रो मार्गावर मुुंढवा मेट्रो स्टेशन होऊ शकते. परंतु, मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी महामेट्रो आणि महापालिका प्रशासनाला हडपसर-खराडी रस्त्यासह मुंढव्यातील मुख्य चौकाच्या रूंदीकरणाचाही प्रश्न सोडवावा लागणार आहे.
मेट्रोच्या कामाच्या पुढील टप्प्यात खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या मार्गाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये मुंढवा स्टेशन असणार. परंतु, हडपसर ते खराडी हा रस्ता अरूंद आहे तसेच मुंढवा चौकातही जागा कमी आहे. मेट्रोचे खांब टाकण्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण करणे गरजेचे ठरणार आहे. मुंढवा चौकाच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव पालिकेसह बांधकाम विभागाकडे प्रस्तावित आहे. मेट्रो मार्ग येथे येणार असेल तर तत्पूर्वी हा प्रश्न प्रशासनास सोडवावा लागेल.
‘ताबा पावती’मुळे प्रश्न रेंगाळला
मुंढवा चौक वाहतुकीच्या तुलनेत तसेच रस्ते अरूंद पडत असल्याने या चौकासह जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असते. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याच कारणातून येथील चौक व रस्त्यांच्या रूंदीकरण होणे गरजेचे असताना हा प्रश्न भूसंपादना अभावी रखडला आहे. नागरिक जागा देण्यास तयार आहेत. परंतु, भुसंपादनाचा प्रश्न “ताबा पावती’ तसेच नुकसान भरपाईच्या मुद्यावर अडकला आहे. यावर महापालिकेने तातडीने हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे…
हडपसर ते खराडी मार्गाच्या प्रस्तावात समावेश
रस्ता अरूंद असल्याने रुंदीकरणाचे काम गरजेचे
भूसंपादनाच्या कारणास्तव चौकाचे रूंदीकरण रेंगाळलेले
महामेट्रो, महापालिकेकडून सुटू शकतो प्रश्न
या तांत्रिक बाबी महत्त्वाच्या…
मुंढवा चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर असे पर्याय सूचविण्यात आलेले आहेत. परंतु, ताडीगुत्ता येथील रेल्वे उड्डाणपूल, ऍमनोरा पार्ककडे जाणाचा रेल्वे उड्डाणपूल तसेच खराडी येथील वाहतुकीसाठी केलेला मुळा-मुठा नदीवरील उड्डाणपूल पाहता या मार्गावर मेट्रो आणताना याबाबींचाही विचार करावा लागणार आहे. मेट्रोसाठी स्वतंत्र पूल करावा लागणार आहे. मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी मुंढवा चौकातील वाहतूक कोंडीवर पर्याय शोधावा लागणार आहे.