वॉशिंग्टन :- गेल्या 3 वर्षांपासून जगभर थैमान घालणाऱ्या करोनाच्या साथीला कारणीभूत असलेला विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतूनच पसरला असावा, अशी शक्यता अमेरिकेच्या उर्जा विभागाने व्यक्त केली आहे. या संदर्भातील एक गोपनीय अहवाल व्हाइट हाउस आणि संसदेच्या महत्वाच्या सदस्यांना पाठवण्यात आला असल्याचे वृत्त अमेरिकेतील प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
वुहान या चीनच्या मध्यवर्ती प्रांतातील हुआनान मार्केट हा करोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू होता. येथूनच 2019 च्या उत्तरार्धात करोनाचा विषाणू वेगाने संपूर्ण वुहान शहर, अन्य शहरांमध्ये आणि जगभरातही पसरला होता. या विषाणूची उत्पत्ती नक्की कशी झाली, याबद्दल सर्व जगामध्ये शिक्षणतज्ज्ञ, गुप्तचर तज्ज्ञ आणि प्रमुख राजकीय नेत्यांमध्येही खूप उलटसुलट चर्चा होऊन गेली आहे.
विषाणूच्या उगमाबाबत यापूर्वी केलेल्या अभ्यासात “नॅशनल इंटिलिजन्स’चे संचालक एवरिल हायनस यांच्या कार्यालयाच्या कागदपत्रांमधील माहितीची भर घालून उर्जा विभागाने हा अहवाल तयार केला आहे. चीनमधील प्रयोगशाळेतून विषाणू पसरला असावा, या निष्कर्शाचा तपास आता “एफबीआय’च्या सहकार्याने घेतला जाणार आहे. याशिवाय नॅशनल इंटिलिजन्स पॅनेलसह अन्य चार तपास संस्था याकामात सहभागी होणार आहेत.
Turkey : तुर्कीयेत पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का; आणखीन काही इमारतींचे नुकसान
उर्जा विभागाने काढलेला निष्कर्श वैज्ञानिक तज्ज्ञ आणि अमेरिकेतील प्रयोगशाळांच्या नेटवर्कच्या आधारे काढण्यात आला आहे. यापैकी काही प्रयोगशाळांनी आधुनिक जैवशास्त्रीय संशोधनदेखील केले आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. मात्र या अहवालामध्ये ठाम विश्वासाचा अभाव असल्याचे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे.