बेळगाव – कॉंग्रेस पक्ष कर्नाटकचा द्वेष करतो. कर्नाटकमधील नेत्यांचा अवमान करणे हा त्या पक्षाच्या जुन्या संस्कृतीचा भाग आहे. कॉंग्रेसने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही अवमान केला, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोडले.
लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या कर्नाटकमध्ये मोदींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस महाअधिवेशनातील एका घडामोडीचा संदर्भ देऊन कॉंग्रेसवर निशाणा साधला. मूळचे कर्नाटकचे असणाऱ्या खर्गे यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव आहे.
त्यांना 50 वर्षांचा संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाचा अनुभव आहे. जनसेवेसाठी शक्य ते त्यांनी केले. मात्र, कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि वयाने ज्येष्ठ असूनही खर्गे यांना पक्षाच्या महाअधिवेशनात देण्यात आलेली वागणूक पाहून मी व्यथित झालो. महाअधिवेशनात भर उन्हात खर्गे उभे राहिले. त्यांना छत्री देण्यात आली नाही.
मात्र, त्यांच्या बाजूला असणाऱ्यांना छत्री उपलब्ध करण्यात आली. त्यातून खर्गे कॉंग्रेसचे अध्यक्ष असले तरी रिमोट कंट्रोल इतरांच्या हाती असल्याचे सूचित होते, असे मोदी म्हणाले. खर्गे यांच्या बाजूला उभ्या असलेल्या कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या डोक्यावर छत्री धरण्यात आल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्याचा संदर्भ मोदींनी घेतला.