नवी दिल्ली- करोनावरच्या लसीचे जगभरात जोरदार संशोधन सुरू आहे. काही देशांनी त्याच्या मानवावरिल चाचण्याही सुरू केल्या आहेत. लस प्रत्यक्ष बाजारात अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र त्याच्या अगोदरच त्या लसीच्या किंमतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. करोना व्हायरस व्हॅक्सिन फंडिंग स्किमच्या कोऑर्डिनेटर्सनेही या लसीच्या संभाव्य किमतीबाबत सूतोवाच केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लसीची किंमत 40 डॉलर अर्थात भारतीय रूपयांत 2991 रूपये एवढी असू शकेल.
गव्हि व्हॅक्सिन अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेठ बर्कली यांच्या म्हणण्यानुसार लसीचे मूल्य अद्याप निर्धारीत करण्यात आलेले नाही. मात्र श्रीमंत राष्ट्रे आणि गरीब राष्ट्रांतील किंमत वेगवेगळी असावी याची दक्षता आमच्याकडून घेतली जाणार आहे.
कोविडची लस संपूर्ण जगभरात लवकरात लवकर आणि कोणताही पक्षपात न करता पोहोचवली जावी यासाठी कोवॅक्स फॅसिलीटीची स्थापना करण्यात आली असून गव्हि व्हॅक्सिन ही संघटना या फॅसिलीटीचे नेतृत्व करते आहे.
2021 वर्षाच्या अखेरपर्यंत किमान 200 कोटी डोस तयार केले जावेत आणि आपल्या सदस्य देशांपर्यंत ते पोहोचवले जावेत, असे या मंडळींचे उद्दिष्ट आहे. 75 पेक्षा जास्त देशांनी कोवॅक्स फॅसिलीटीत सहभागी होण्याबद्दल अर्थात आमचे सदस्यत्व स्विकारण्याबाबत उत्सुकता दाखवली असल्याचे गव्हिने यापूर्वी म्हटले आहे.
श्रीमंत देशांना 40 डॉलरमध्ये लस उपलब्ध करून देण्याची कोवॅक्सची योजना असल्याची टिप्पणी युरोपीय संघाने केली आहे. त्यांचा हा दावा गव्हिने फेटाळला आहे. यासंदर्भात रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सेठ बर्कली म्हणाले की, लसीच्या वेगवेगळ्या किमती ठरवण्यात आल्या आहेत. श्रीमंत देशांसाठी लसीची एकच किंमत ठरवण्याऐवजी त्यांच्याकरता जास्तीत जास्त 40 डॉलर मूल्य निर्धारित करण्यात आले आहे.
करोनाच्या अनेक लसींची सध्या चाचणी सुरू आहे. त्या अगदी सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आताच किमतीबाबत बोलणे जरा घाईचे ठरेल. शिवाय कोणती लस सगळ्यांत उपयुक्त ठरू शकते याबाबत आम्हाला आताच कोणतीही कल्पना नसल्यामुळे आताच या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही. तूर्त एवढेच सांगता येउ शकते की गरिब देशांना लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही लस निर्मात्यांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ.
गरिब देश, मध्यम देश आणि श्रीमंत देश असे वेगवेगळे किमतीचे स्वरूप असण्याची शक्यता आहे.