प्रवाशांना सहज आरोग्य तपासणी करता येणे शक्य; पुणे विभागातील तीन स्थानकांवर असेल यंत्रणा
– कल्याणी फडके
पुणे – रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना आरोग्याच्या संबंधित सेवा सहज उपलब्ध होणे आवश्यक असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकांवर “हेल्थ कियॉस्क मशिन्स’ बसवण्यास सुरूवात केली असून, पुणे विभागातील तीन स्थानकांवर ही यंत्रणा बसवली आहे.
रेल्वेकडून महसूल वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना आणि कल्पना राबवण्यात येत आहेत. यामध्ये “आरोग्य’ या महत्त्वाच्या विषयाचा समावेश करण्यात आला असून, याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये या योजनेंतर्गत “हेल्थ कियॉस्क मशिन्स’ बसवण्यात येत असून, या यंत्रणांमुळे प्रवाशांना सहज आरोग्य तपासणी करता येणार आहे. “न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम’ (एनआयएनएफआर) या योजनेंतर्गत हे मशिन बसवण्यात आले असून, याद्वारे रेल्वेला प्रतिवर्षी 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
तिकिटाच्या उत्पनाशिवाय (प्रवासी भाड्याशिवाय) महसूल मिळवण्यासाठी रेल्वेच्या संसाधनांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी सन 2018 मध्ये रेल्वे मंत्रालयाने नवीन संकल्पना साकारण्याचा निर्णय घेतला आहे. “एनआयएनएफआर’ ही योजना विभागीय स्तरांवर राबवण्यात येत आहे. यामध्ये पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम, रेल्वे डब्यांमधील “आरओ’ (जल शुद्धीकरण यंत्रणा), मोबाइल फूड कोर्ट, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बोर्ड शॉपिंग, विविध जाहिराती, प्रदर्शने आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
“हेल्थ कियॉस्क मशिन्स’चा उपक्रम चांगला आणि प्रवाशांच्या हिताचा आहे. मात्र, प्रवाशांची घाई लक्षात घेता त्यांना सोयीस्कर नाही. रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा उपयोग होऊ शकतो, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.
नाशिक रोड रेल्वे स्थानकांत “ऑक्सिजन पार्लर’
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड येथील “ऑक्सिजन पार्लर’ देखील “एनआयएनएफआर’ योजनेंतर्गत बसविण्यात आले आहे. या “ऑक्सिजन पार्लर’मध्ये “नासा’ची मान्यता असणारी आणि सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपे आहेत. हवाशुद्धी आणि पर्यावरणाच्या हितासाठी हे सुरू करण्यात आले आहे.
तपासणी अत्यल्प दरात
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे, शिवाजीनगर, तळेगाव स्थानकांत “हेल्थ एटीएम’ बसवले आहे. तर मिरज आणि कोल्हापूर स्थानकांत यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये “हिमोग्लोबिन’, “बीएमआय’, वजन, उंची, “ब्लड ग्लुकोज’ आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्यांसाठी 16 पॅरामीटर्ससाठी 50 रुपये आणि 18 पॅरामीटर्ससाठी 100 रुपये आकारण्यात येणार आहे.