लोणावळा – विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अर्थात वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय व ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीकडे जगभराचे लक्ष लागलेले आहे. अहमदाबादमध्ये हा सामना खेळविण्यात येत असला तरी या स्पर्धेमुळे लोणावळा मधील हॉटेल व्यावसायिकांची चांदी झालेली आहे. लाइव्ह स्क्रीनिंगच्या सुविधेला क्रीडाप्रेमीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दोन दिवस आधी शुक्रवारी (दि.. 17) बहुतांश ठिकाणचे बुकिंग फुल झाल्याचे चित्र होते.
सध्या देशभरात क्रिकेटचा फिव्हर बघायला मिळतो आहे. विजेतेपदासाठीचा अंतिम सामना रविवारी (ता. 19) खेळविला जाणार आहे. सर्व क्रीडाप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिकीट मिळविण्यापासून या शहरातील हॉटेल्स व फ्लाइटचे दर गगनाला भिडलेले आहे. त्याचप्रमाणे हा इव्हेंट कॅश करण्यासाठी लोणावळा मधील हॉटेल व्यावसायिकही मैदानात उतरले आहेत. मोठ्या अलिशान हॉटेल्सपासून सामान्य हॉटेल्स, अशा सर्व स्तरावर सामन्याचे प्रक्षेपण बघण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्यास क्रीडाप्रेमीचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, शुक्रवारी हॉटिल्सकडे चौकशी केली असता, बहुतांश ठिकाणी बुकिंग फुल झाल्याचे सांगण्यात आले.
सामन्यादरम्यान लाखो रुपयांची उलाढाल शक्य
पंचतारांकित हॉटेल्सकडून तीन ते पाच हजार रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे बुकिंग केली जाते आहे. यामध्ये स्क्रीन असलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी एक हजार रुपये व उर्वरित रक्कम ही खाद्यपदार्थ, पेय खरेदीसाठी देऊ केली जाते आहे. काही हॉटेल्समध्ये 25 ते 30 आसनांचे मिनी थिएटर असून, त्यांचीही बुकिंग झालेली आहे. सर्वच छोट्या-मोठ्या हॉटेल्सला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सामन्याच्या वेळेदरम्यान हॉटेल व्यवसायात लाखो रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
फार्महाउसची बुकिंग जोरात
मावळ तालुका आणि विशेषतः लोणावळा शहर हा मुंबईकरांसाठी नेहमीच वीकएंड डेस्टीनेशन राहिलेला आहे. अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठीदेखील मुंबईकर मावळच्या दिशेने पावले वळवत आहेत. यातून कार्ला, पवना धरण, लोणावळा भागातील फार्महाउसची जोरदार बुकिंग केली जाते आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी फार्महाउस व्यवस्थापनाकडून टीव्ही स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे.
… अशी केली आहे हॉटेल व्यावसायिकांनी तयारी
फायनलच्या दिवसासाठी विशेष मेन्यू तयार
खवय्यांना वैविध्यपूर्ण डिशेसवर ताव मारता येणार
रेस्टॉरंटमध्ये स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण पाहाण्याची सुविधा
काही हॉटेल्सकडून बिलामध्ये सवलत जाहीर
खास क्रिकेट लूकसाठी हॉटेल्सची सजावट
काहींकडून टीशर्ट, टोपीची ग्राहकांना भेट