हॉट सीट – एमआयएमला अपेक्षा उत्तरेतील पहिल्या विजयाची

किशनगंज

कॉंग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारमधील किशनगंज लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. याचे कारण या मतदारसंघात संयुक्‍त जनता दलाबरोबरच ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या तिरंगी लढतीमुळे कॉंग्रेसपुढे गड वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

एमआयएमने पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला आहे. या पक्षातर्फे माजी आमदार अख्तरुल इमान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इमान यांना जदयुने उमेदवारी दिली होती. पण मतदानाच्या 10 दिवस आधी त्यांनी मुस्लीम मतांची विभागणी होऊ नये आणि भाजपाला पराभूत करता यावे यासाठी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली होती.

अर्थात तोपर्यंत उशिर झाला होता. तरीही त्यांना 3.88 टक्‍के मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. 2009 मध्ये जदयुच्या उमेदवाराला 13.41 टक्‍के मते मिळाली होती. याचाच अर्थ 2014 मध्ये जदयुची मते 10 टक्‍क्‍यांनी घटली. अर्थातच याचा फायदा कॉंग्रेसला झाला आणि 34.29 टक्‍के मते मिळवत कॉंग्रेसचे असरारुल हक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. ते 2009 मध्येही विजयी झाले होते. मात्र त्यावेळी त्यांना 20.18 टक्‍के मते मिळाली होती.

यंदा कॉंग्रेसला विजय तितकासा सोपा नाही. कारण असरारुल हक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने किशनगंजमधून डॉ. जावेद यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्यापुढे एनडीएचे उमेदवार महमूद अशरफ आणि एमआयएमच्या अख्तरुल यांचे आव्हान आहे. 16.5 लाख मतदार असणाऱ्या किशनगंजमध्ये एकूण 14 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी 8 मुस्लीम आहेत.

असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला या मतदारसंघाद्वारे उत्तर भारतातील पहिला विजय नोंदवायचा आहे. त्यामुळे स्वतः ओवेसी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून आहेत. तेथील प्रचार रॅलीमध्ये ते सहभागी होत आहेत. अख्तरुल यांनी 2015 मध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला असून पक्षाने त्यांना 2015 मध्ये कोचाधामन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. पण तेथे ते पराभूत झाले. असे असूनही किशनगंजमध्ये त्यांना रिंगणात उतरवण्यात आले कारण येथे मुस्लिम मतदारांची संख्या 56 टक्‍के आहे.

दृष्टीक्षेप – 1957 मध्ये किशनगंज लोकसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. तेव्हापासूून आतापर्यंत कॉंग्रेसने सात वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून कोणत्याही पक्षाला सलग तीन निवडणुका जिंकता आलेल्या नाहीत. 1957 आणि 1962 मध्ये विजयी झालेल्या कॉंग्रेसला 1967 मध्ये पराभव पत्करावा लागला. पुढे 1971, 1980 आणि 1984 मध्ये पुन्हा कॉंग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला. पण 1977 मध्ये कॉंग्रेसला येथून पराभव पत्करावा लागला होता. 1991 मध्ये जनता दलाचे नेते शहाबुद्दीन, 1996 मध्ये जनता दलाचेच तस्लीमुद्दीन, 1998 मध्ये पुन्हा राजदकडून तस्लीमुद्दीन आणि 1999 मध्ये भाजपाचे शाहनवाझ हुसेन आणि 2004 मध्ये पुन्हा तस्लीमुद्दीन असा या मतदारसंघाचा इतिहास राहिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.