मुंबई, दि. 27 – मुंबईत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत नऊ जणांचा तेथे होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले आहेत. यात एचडीआयएल कंपनीचा प्रमोटर राकेश वधवान, त्याचा मुलगा सारंग यांचाही समावेश आहे.
ज्या मॉल मध्ये हे हॉस्पिटल आहे त्या मॉलचा सारंग हा संचालक आहे. या मॉलच्या संचालक मंडळात निकीता अमितसिंह त्रेहन, दीपक शिर्के हेही संचालक आहेत. त्यांचीही नावे एफआरआर मध्ये आहेत.
पोलिसांनी आगीच्या कारणांची प्राथमिक चौकशी केली. त्यात मॉलच्या ज्या इमारतीत हे हॉस्पिटल होते तेथे सुरक्षाविषयक अनेक त्रृृटी आढळून आल्या. दुर्घटना टाळण्यासाठी जी दक्षता घेणे आवश्यक होते ती तेथे घेतली गेली नव्हती असेही निदर्शनाला आले आहे. 107 बेडचे हॉस्पिटल इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर होते व तेथे 78 कोविड रूग्णांवर उपचार सुरू होते.
या मॉलमध्ये एक हजार 108 दुकाने असली तरी त्यातील 40 टक्के बंद होती किंवा सुरूच झाली नव्हती, असे आढळून आले आहे. जानेवारी महिन्यात सनराईज हॉस्पिटलचे रुपांतर करोना केअर सेंटरमध्ये करण्यात आले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुरूवारी मध्यरात्रीनंतर एका दुकानात आगीने पेट घेतला. त्यानंतर ती चौथ्या मजल्यावरील रुग्णालयाच्या दिशेने भडकत गेली, असे अग्नीशामक दलाच्या सुत्रांनी सांगितले. आग लागली त्यावेळी 78 जणांवर या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील 67 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.