पुणे – पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनतर्फे कर्तव्य सेवा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे आणि कार्याध्यक्ष अशोक देशमुख यांच्या हस्ते गायकवाड यांना शाल, सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक सुनील ताकवले,सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, ग्रंथपाल दिलीप भिकुले, फाउंडेशनचे सदस्य मोहसीन शेख उपस्थित होते.
संजय गायकवाड हे गेली 37 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी विश्रामबाग, वानवडी, फरासखाना, खडक, लष्कर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा येथे कर्तव्य बजावले आहे. सध्या ते गुन्हे शाखा पुणे शहर युनिट 1 येथे कार्यरत आहेत. तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील तपास पथकात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती.
त्याकरिता त्यांना पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तीपत्रक मिळाले होते. 2015 मध्ये त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले होते. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 520 हून अधिक अवार्डस मिळाले आहेत.